गडचिरोली:- सोशल मीडियावरील बनावट जाहिराती आणि आर्थिक प्रलोभने दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सायबर फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावला असून, ७ तरुणींच्या नावे बोगस बँक खाती उघडून तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिकचे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, गडचिरोली येथे शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीची ४ जून २०२६ रोजी केदारनाथ सहलीदरम्यान गडचिरोलीतीलच एका २२ वर्षीय युवतीशी ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री घट्ट झाल्यानंतर, २० ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी युवतीने तिचे बँक खाते होल्ड झाल्याचे कारण सांगून, ट्रेडिंग करण्यासाठी मैत्रिणींच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नवीन खाती उघडून देण्याची विनंती केली.
विश्वासापोटी मैत्रिणी तयार झाल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात त्यांची कागदपत्रे घेऊन नवीन सिमकार्ड खरेदी करण्यात आली आणि ती बँक खात्यांशी लिंक करण्यात आली. आरोपी युवती खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड स्वतःसोबत घेऊन गेली. पुढे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीच्या घरी बँकेकडून मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार झाल्याची नोटीस आली. मैत्रिणींनी बँकेत जाऊन खात्यांची पडताळणी केली असता, सातही खात्यांमध्ये मिळून तब्बल १ कोटी ४ लाख ५२ हजार रुपयांहून अधिकचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघडकीस आले.
आपल्या परवानगीशिवाय खात्यांचा वापर करून विश्वासघात केल्याप्रकरणी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी जुही विनायक मेश्राम (वय २३, रा. आशीर्वाद नगर, गडचिरोली) हिस ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता, पुणे येथील तिचा मित्र सात्विक दीपक सावडीया (वय २२, रा. रायगड, छत्तीसगड) याने तिला ट्रेडिंगसाठी ७ बँक खाती मिळवण्यास सांगितल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० ऑक्टोबर २०२६ रोजी सात्विक सावडीया यास देखील बेड्या ठोकल्या.
दहशत आणि सायबर गुन्हेगारीच्या या जाळ्यात अडकलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खात्यांमध्ये जमा झालेली ही प्रचंड रक्कम नेमकी कुठून आली आणि पुढे कुठे वर्ग झाली, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहेत.
डिजिटल युगात कोणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या कागदपत्रांवर बँक खाती उघडून देणे किंवा खात्यांची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करणे किती महागात पडू शकते, याचे हे ताजे उदाहरण आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कामगिरीमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.


