गडचिरोली:- सोशल मीडियावरील आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तूंच्या जाहिरातींवर विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचे उत्तम उदाहरण गडचिरोली जिल्ह्यात समोर आले आहे. दीड हजार रुपयांच्या फसवणुकीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तब्बल २७०० किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थान गाठले आणि सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला शिताफिने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी एका फिर्यादीने फेसबुकवर ‘Sajja Handloom’ नावाची बेडशीट विक्रीची जाहिरात पाहून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता आणि एका बेडशीटसाठी ५५०/- रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘PP Collection AC Comfuter set Bedsheets’ या नावाची आणखी एक जाहिरात पाहून तीन बेडशीटसाठी १,०००/- रुपये पाठवले. अशा प्रकारे एकूण १,५५०/- रुपये पाठवूनही ऑर्डर केलेली वस्तू त्यांना मिळाली नाही. संबंधित दुकानाच्या मूळ मालकाशी संपर्क साधला असता, त्यांच्या दुकानाच्या नावाचा गैरवापर करून कोणतीतरी अज्ञात व्यक्ती ऑनलाईन फसवणूक करीत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क्रमांक ११९२/२०२६, कलम ३१८ (४), ३१९ (२) भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ सहकलम ६६ (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले. यादरम्यान आरोपी राजस्थान राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गडचिरोली पोलिसांचे पथक थेट राजस्थान येथे रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने साहिल जमशेद उर्फ साहिल जमशेद खान (वय २५ वर्ष, रा. सोमका, तह. पहाडी, जि. डीग, राजस्थान) यास दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या शिताफिने अटक केली। सक्षम न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीस १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली येथे आणण्यात आले. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करीत आहेत.
सध्या गडचिरोली पोलीस दलातर्फ ०१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘सायबर सुरक्षा जनजागृती महिना’ राबविण्यात येत आहे. याच जनजागृतीमुळे नागरिक जागरूक झाल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत नोंदवली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
गडचिरोली पोलीस दलातर्फे नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर अतिशय कमी किमतीत वस्तू विक्रीच्या जाहिराती पाहून अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवू नका. ओळखीच्या किंवा मित्रांच्या सांगण्यावरून आपले बँक खाते किंवा कागदपत्रे दुसऱ्या कोणालाही वापरू देऊ नका. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.


