Chandrapur police: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपुरात वाहतुकीत मोठे बदल

Bhairav Diwase
१५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान शहरातील ‘हे’ मार्ग राहणार बंद!

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी येथे १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याभरातून आणि जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश १५ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजल्यापासून १७ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.


दीक्षाभूमी परिसराकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याच्या टाकी चौक, जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड, हुतात्मा स्मारक जवळील रस्ता, वरोरा नाका चौक ते मित्रनगर चौक, सिंधी पंचायत भवन आणि मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंतचा संपूर्ण परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच हा संपूर्ण परिसर ‘नो पार्किंग व नो हॉकर्ज झोन’ म्हणून घोषित करण्यात आला असून, या काळात येथे कोणतीही वाहने किंवा पथारीवाले (हॉकर्स) उभे करता येणार नाहीत.

नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी जड वाहने: हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगरवरून मूल रोडने जातील.

मुलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने: बंगाली कॅम्प - सावरकर चौक - वरोरा नाका उड्डाणपूल मार्गे किंवा नेहरू नगरवरून सीटीपीएस मार्गे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका - सावरकर चौक - वरोरा नाका उड्डाणपुलाजवळ ही वाहने थांबवली जातील.

बल्लारशहाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने: बंगाली कॅम्प - नेहरू नगरवरून सीटीपीएस मार्गे किंवा गर्दी पाहून बंगाली कॅम्प डी.आर.सी. बंकर बायपास रोडवर थांबवली जातील.


जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय, मित्रनगर चौक ते टीव्ही हॉस्पिटल तसेच पाण्याची टाकी ते जुना वरोरा नाका हा मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर आणि वडगाव परिसरातील नागरिकांनी पाण्याची टाकी - दवा बाजार - संत केवलराम चौक - दाताळा रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. नागपूरकडून शहराकडे येणारी हलकी वाहने वरोरा नाका उड्डाणपूल - सिध्दार्थ हॉटेल - बस स्टँड - प्रियदर्शनी चौक मार्गे जातील.


नागपूर रोडने येणाऱ्यांसाठी: शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान).
शहरातून येणाऱ्यांसाठी: सेंट मायकल स्कूल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान.
वडगाव, आकाशवाणी व लगतच्या परिसरासाठी: लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियम जवळ).
 मूल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम परिसरासाठी: कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड (फक्त मोटारसायकलसाठी).


धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व अनुयायांनी आणि नागरिकांनी या बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा व ठरवून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणांचा वापर करावा. तसेच प्रशासनाला व पोलीस विभागाला सहकार्य करून शहरात शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.