Chandrapur News: चंद्रपूर वीज केंद्रात कॉपर केबलनंतर आता ‘पाइप चोरी’चा भांडाफोड; चौघे ताब्यात!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कॉपर केबल चोरी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता ॲश पाइप चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. ॲशबंड परिसरातून पाइप कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि गॅस कटरसह तब्बल २६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील चोरीच्या घटनांमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २२ लाख रुपयांच्या कॉपर केबल चोरी प्रकरणानंतर आता ॲश पाइपलाइन चोरीचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ॲशबंड परिसरात ही घटना उघडकीस आली. सीएसटीपीएसचे देखभाल कर्मचारी सुनील जोगी आणि एमएसएफचे सुरक्षारक्षक शंकर जाधव हे पाइपलाइन परिसरात गस्तीवर असताना त्यांना पाइपचे तुकडे भरलेले दोन ट्रॅक्टर जाताना दिसले.


संशय आल्याने त्यांनी तातडीने दोन्ही ट्रॅक्टर रोखले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता प्रज्ञाशील रामटेके, उपकार्यकारी अभियंता विजय बंडोले, सुरक्षा अधिकारी आणि दुर्गापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


जेसीबीने पाइप उखडले, गॅस कटरने केले तुकडे!

चोरीसाठी चक्क चेन माउंट एक्स्कॅव्हेटर अर्थात जेसीबीचा वापर करण्यात आला होता. गॅस कटर आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या साहाय्याने पाइपचे सुमारे साडेतीन फुटांचे २५ तुकडे करण्यात आले होते. हे तुकडे दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून नेले जात असल्याचे समोर आले.


या प्रकरणात मोहम्मद शारीक मोहम्मद सना, अहमद बाबू शेख, भाविक यादव बंटे आणि रूपेश यादव बंटे या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान श्रीकांत काळे आणि हाशीम खान यांच्या सांगण्यावरून पाइप कटिंगसाठी वाहने आणि मशीन आणल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे.


या कारवाईत दोन ट्रॅक्टर, चेन माउंट एक्स्कॅव्हेटर, गॅस कटर, सिलिंडर आणि इतर साहित्य असा एकूण २६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


एकीकडे कॉपर केबल चोरी आणि दुसरीकडे ॲश पाइपलाइन चोरीचा प्रकार समोर आल्याने चंद्रपूर वीज केंद्रातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.