पोंभुर्णा:- यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी आता ठेवीदार आक्रमक झाले आहेत. येत्या १ नोव्हेंबर रोजी पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ठेवीदार, कर्मचारी आणि एजंट बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव पिंपळशेडे यांनी केले आहे.
यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पैसे जमा केलेल्या ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी आता संघर्ष तीव्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठेवीदारांनी मुलांच्या शिक्षणासाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी, आजारपणासाठी तसेच वृद्धापकाळाच्या आधारासाठी आयुष्यभराची कमाई सोसायटीमध्ये जमा केली आहे. मात्र, हे पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना संघर्ष करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात चिमूर, वरोरा, पोंभुर्णा यासह चंद्रपूर जिल्ह्यातील आणि इतर तालुक्यांतील सर्व ठेवीदार, कर्मचारी व एजंट बांधवांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव पिंपळशेडे यांनी केले आहे.
ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळालेच पाहिजेत, ही प्रमुख मागणी घेऊन शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने हा लढा उभारण्यात येणार आहे. आपल्या कष्टाच्या पैशांसाठी, आपल्या हक्कासाठी आणि कुटुंबाच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैभव पिंपळशेडे यांनी केले आहे.


