Rajura Murder : दीड वर्षानंतर अकस्मात मृत्यूच्या चौकशीत खुनाचा उलगडा!

Bhairav Diwase

राजुरा:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल दीड वर्षांपूर्वी घडलेल्या एका मृत्यूच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात पोलिसांच्या सखोल तपासातून खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, वडिलांच्या मृत्यूबाबत आत्महत्येचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करणारा मुलगाच या प्रकरणात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान राजुरा तालुक्यातील चार्ली शेतशिवारात शंकर परशुराम काळे (वय ६०) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राजुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४४/२०२५ अन्वये मर्ग दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.


मात्र, मयताच्या शवविच्छेदनाच्या अंतिम वैद्यकीय अहवालातून धक्कादायक बाब समोर आली. शंकर काळे यांचा मृत्यू विषारी औषध प्राशन केल्याने किंवा आत्महत्येमुळे झाला नसून, गळा दाबल्यामुळे हायॉइड बोन फ्रॅक्चर होऊन झाल्याचे स्पष्ट झाले.


दरम्यान, सुरुवातीला मयताचा मुलगा निखील शंकर काळे (वय ३१, रा. धिडसी, ता. राजुरा) याने वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खोटी माहिती देत बनाव रचल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी मर्ग चौकशीदरम्यान निखील काळे याची पुन्हा सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हा प्रकार आत्महत्या नसून खून असल्याचे स्पष्ट झाले.


यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या फिर्यादीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि २४० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि पोलीस पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.