चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली असून, याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कापूस भिजल्यामुळे त्याची प्रतवारी घसरून बाजारात कमी भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात भात, सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. त्यापैकी सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची भीती व्यक्त होत असून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.


