Chandrapur News : पुलावर 'महाराष्ट्र' आणि पाण्यात उतरताच थेट 'व्हिएतनाम'

Bhairav Diwase
पोंभूर्ण्यातील प्रकार; अवघ्या मीटरच्या फरकातच 'हनोई'चे लोकेशन!

पोंभूर्णा:- मोबाईलच्या जीपीएस लोकेशनमध्ये काही मीटरच्या अंतराने थेट देशच बदलत असल्याचा अजब प्रकार पोंभूर्णा येथे समोर आला आहे. पुलावरून फोटो काढल्यास पोंभूर्णा महाराष्ट्राचे लोकेशन दिसते; मात्र त्याच पुलाखाली पाण्यात उतरून फोटो काढताच व्हिएतनाममधील ‘फुक थिन्ह, हनोई’ असे लोकेशन नोंदविले जात आहे. या प्रकारामुळे मोबाईलमधील लोकेशनच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोंभूर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयाचे विद्यार्थी आक्सापूर मार्गावरील नाल्यावर बंधारा बांधण्याचे काम करीत होते. या वेळी एका विद्यार्थ्याने मोबाईलमधील ‘जीपीएस मॅप कॅमेरा’ ॲपद्वारे छायाचित्र घेतले. मात्र, छायाचित्रासोबत पोंभूर्ण्याऐवजी व्हिएतनाममधील लोकेशन दिसल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी हा प्रकार प्रा. डॉ. संजय उगेमुगे यांच्या निदर्शनास आणून दिला.

विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या छायाचित्रांबाबत खात्री करण्यासाठी प्रा. डॉ. उगेमुगे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. पुलावरून छायाचित्र घेतल्यास महाराष्ट्रातील योग्य लोकेशन दिसत असल्याचे आढळले. मात्र, पुलाखाली पाण्यात उतरून त्याच ॲपद्वारे छायाचित्र घेताच व्हिएतनाममधील ‘फुक थिन्ह, हनोई’ असे लोकेशन दिसल्याचे त्यांनी सांगितले. 


अवघ्या काही मीटरच्या अंतरावर लोकेशनमध्ये एवढी मोठी तफावत दिसल्याने या घटनेबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.