पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास वाघाने एका गुराख्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ६० वर्षीय गुराखी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजेश्वर बिजा सिडाम (वय ६० वर्षे) हे नेहमीप्रमाणे गायीला चारण्यासाठी जंगलात गेले होते. यावेळी सातारा तुकूम येथील वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश्वर सिडाम गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी राजेश्वर सिडाम यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


