Gadchiroli News : जनजातीय गौरव दिन सोहळ्यानिमित्त १५ नोव्हेंबरला जड वाहतुकीवर निर्बंध

Bhairav Diwase

गडचिरोली:-
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चामोर्शी–नागपूर, धानोरा–नागपूर, आरमोरी–धानोरा–चामोर्शी, चंद्रपूर–चामोर्शी आणि धानोरा–चंद्रपूर या पाच प्रमुख मार्गांवरील जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या निर्बंधांतून प्रवासी बसेसना वगळण्यात आले असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.


गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असून, सुमारे आठ हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची गैरसोय टाळता यावी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी जड वाहनांच्या वाहतुकीचे तात्पुरते नियमन करण्यात आले आहे.


जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित मार्गांवर दोन्ही दिशांनी जड वाहनांच्या वाहतुकीस निर्बंध राहणार आहेत. मात्र, प्रवासी बसेसना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. जड वाहनचालक व वाहतूकदारांनी निर्धारित कालावधीत पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा.


जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

१. चामोर्शी ते नागपूर : चामोर्शी–हरणघाट–चांदापूर–मूल–सिंदेवाही–नागभीड–नागपूर.

२. धानोरा ते नागपूर : धानोरा–चातगाव–मुरमाडी–मौशीखांब–वडधा–पोर्ला–आरमोरी–ब्रह्मपुरी–नागपूर.

३. आरमोरी–धानोरा ते चामोर्शी : पोर्ला टी-पॉइंट–वडधा–मौशीखांब–चातगाव–खुटगाव–कारवाफा–पोटेगाव–पाविमुरांडा–आबापूर–सिमुलतला–घोट–चामोर्शी.

४. चंद्रपूर ते चामोर्शी : चंद्रपूर–मुरखडा–मुडझा–वाकडी फाटा–शिवणी–तळोधी–चामोर्शी.

५. धानोरा ते चंद्रपूर : चातगाव–खुटगाव–कारवाफा–पोटेगाव–पाविमुरांडा–आबापूर–सिमुलतला–घोट–चामोर्शी–मूल–चंद्रपूर.


वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

वाहतूक निर्बंधांच्या कालावधीत सर्व जड वाहनचालक व वाहतूकदारांनी निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ व ११६ मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.


जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा सुरळीत पार पडावा आणि नागरिकांना वाहतुकीसंदर्भात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व वाहनचालक, वाहतूकदार व नागरिकांनी वाहतूक नियमनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.