चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 19.220 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत 42 हजार 284 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला 12 नोव्हेंबर 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंदनगर, महाकाली कॉलरी परिसरातील दोन संशयितांच्या घराची झडती घेतली.
यावेळी शुभम संजय वासेकर (वय 24) आणि संजय महादेव वासेकर (वय 52) यांच्या घरातून 19.220 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 8(क) आणि 21(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते यांच्यासह चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


