Top News

सन २०१९ मधील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांना विशेष प्रकल्प अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा:- जि.प.सदस्य संजय गजपुरे

चंद्रपूर जिल्हयातील हे सर्व लाभार्थी या लाभापासून वंचित राहीलेले.
Bhairav Diwase.    July 23, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सन २०१९ च्या माहे जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे  चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे . काही घरे अंशत: तर काही पुर्णपणे पडलेली आहेत. मोठया प्रमाणात घरांची पडझड होवून ती घरे राहण्याजोगी राहीलेली नाही. अश्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ देणेकरीता शासनाकडुन माहीती मागविण्यात आलेली होती.
       अतिवृष्टीने बेघर झालेल्यांना घरकुलाचा लाभ देणेकरीता राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांचेकडुन आवास प्लस या प्रणालीमध्ये सदर लाभार्थींच्या नोंदी घेवून त्यांना लाभ देण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या होत्या. परंतू सदर पत्रामध्ये महाराष्ट्रातील फक्त १२ जिल्हयांचा समावेश होता व चंद्रपूर जिल्हयाचा समावेश त्यात नसल्याने चंद्रपूर जिल्हयातील लाभार्थींच्या नोंदी सदर प्रणालीमध्ये करण्यात आलेल्या नाही.  पर्यायाने चंद्रपूर जिल्हयातील हे सर्व लाभार्थी या लाभापासून वंचित राहीलेले आहेत.
              चंद्रपूर जिल्हयात सन २०१९ च्या माहे जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे  पडझड झालेल्या प्र. आ.यो.-  ग्रा. अंतर्गत प्रपत्र – ब (PWL) मध्ये समाविष्ट असलेले ४२ लाभार्थी आहेत त्यांना प्र.अ.यो. ग्रा. अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. प्र. आ.यो. - ग्रा. अंतर्गत प्रपत्र – ब (PWL) मध्ये समाविष्ट नसलेले परंतू अनु. जाती/ जमाती प्रवर्गातील ३०७ लाभार्थी आहेत त्यांना राज्य पुरस्कृत रमाई व शबरी आवास योजने मधून  लाभ देण्यात येणार आहे. परंतू प्र. आ.यो. - ग्रा. अंतर्गत प्रपत्र – ब (PWL) मध्ये समाविष्ट नसलेले परंतू इतर प्रवर्गातील ५५८ लाभार्थी आहेत अश्या लाभार्थींकरीता कुठलीच इतर योजना नाही व त्यांची नावे आवास प्लस प्रणालीमध्येसुध्दा समाविष्ट झालेली नाही त्यामुळे असे सर्व लाभार्थी लाभापासुन वंचित राहील.
       इतर प्रवर्गातील ५५८ लाभार्थींकरीता महाराष्ट्र शासनाकडुन चंद्रपूर जिल्हयासाठी विशेष प्रकल्प मंजूर करुन  लवकरात लवकर या वंचितांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी चंद्रपुर जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार, राज्याचे माजी अर्थमंत्री व भाजपा चे राज्याचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा चंद्रपुरचे जिल्हाधिकारी खेमणार साहेब यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने