डॉ.गिरिधर काळे सामजिक प्रतिष्ठान व पाथ फाऊंडेशनचा पुढाकार.
नांदा येथे तालुका बालविकास अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ.
Bhairav Diwase. Aug 04, 2020
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल कोरपना तालुक्यात कुपोषित बालकांसाठी "जाणीव माणुसकीची" या अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. या विधायक उपक्रमांतर्गत कोरपना तालुक्यातील ४६ मध्यम व १४ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ नांदा येथे तालुका बालविकास अधिकारी गणेश जाधव, शरदचंद्र पारखी यांच्या हस्ते करण्यात आला. कोरपना तालुक्यात एकुण तिव्र व मध्यम असे ६० मुले कुपोषित आहे. त्यांना योग्य जीवनसत्व देणारा आहार दैनंदिन मिळाला तर नक्कीच काही महिन्यात आपण या तालुक्यातील बालकांना कुपोषनातून साधारण श्रेणीत आणू शकतो. मध्यम व तिव्र कुपोषित बालकांना तीन महिने आहार पुरवठा पाथ फाऊंडेशन व डॉ. गिरिधर काळे सामजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होणार आहे. या पोषण आहार किटमध्ये आवश्यक हरभरा,मुग,वटाणे,बरबटी,गुळ, शेंगदाणे, अंडे व मोट देण्यात येत आहे.
जाणीव माणुसकीची अभियानाचे विशेष म्हणजे
प्रत्येक ग्राम स्तरावर सामाजिक क्षेत्रात आवड असणारा 'ग्रामसाथी कार्यरत राहील. या अभियानांतर्गत तालुक्यातील ज्या गावात कुपोषित बालक असेल तिथे प्रत्यक्ष जाऊन पोषण आहार किट्स देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, किट वितरण होण्याआधी त्या बाळाचे वजन, उंची, दंडघेर आदी माहिती घेतली जात आहे. तर, तीन महिन्याच्या आहार दिल्यानंतर बालकांत झालेला बदल समजून घेण्यासाठी पुन्हा वजन, उंची, दंडघेर ही माहिती प्रत्यक्ष जाऊन बघितली जाईल. एकंदरीत मुलांची आरोग्य तपासणी तसेच प्रगती अहवाल व पारदर्शकता राहील अशी माहिती अविनाश पोईनकर व दीपक चटप यांनी दिली.
नांदा येथे जाणीव माणुसकीची अभियान शुभारंभ प्रसंगी प्रतिक्रिया देताना बालविकास अधिकारी गणेश जाधव म्हणाले की, कुपोषित बालकांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून सामाजिक दायित्व जोपासत कोरपना तालुक्यात सुरू झालेले हे अभियान कौतुकास्पद आहे. तर शरदचंद्र पारखी म्हणाले की, पालकांनी कुपोषित बालकाकडे दुर्लक्ष करू नये. जाणिव माणुसकीची अभियानाला शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य असेल. कोरपना तालुक्यात पुढील ३ महिने चालणाऱ्या या अभियानातून नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील.
या शुभारंभ प्रसंगी डॉ. गिरिधर काळे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रा.स. रत्नाकर चटप, संतोष उपरे, हबीब शेख उपस्थित होते.