आशावर्कर ताईची ओवाळणी "भाऊराया"ने तातडीने द्यावी:- आम आदमी पार्टीची मागणी

Bhairav Diwase

Bhairav Diwase. Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- "पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा" अंतर्गत जिल्ह्यातील आशावर्कर ताईंना अकराशे रुपये रोख व चारशे रुपयाची साडीचोळीची किट, रक्षाबंधनाला दीड महिना लोटूनही अजून पर्यंत मिळाली नसल्याने, जाहीर केल्याप्रमाणे आशावर्कर ताईना त्यांची "ओवाळणी" पालकमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने पाठविण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केली आहे.
दिनांक 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोणा संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांच्या कार्याचा एक भाग म्हणून अभिमान असल्याचे सांगत प्रशासनातर्फे आशा वर्करच्या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडीचोळी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार दिनांक 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडक आशाताईंच्या हस्ते राखी बांधून अकराशे रुपये रोख आणि चारशे रुपयाची कीट देऊन या योजनेचा शुभारंभ केला. मात्र योजनेचा शुभारंभ होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरीही जिल्ह्यातील आशा वर्करना पालकमंत्र्यांची ही "ओवाळणी" मात्र अजून पर्यंत प्राप्त झाली नसल्यान आशा वर्करनी खंत व्यक्त केली.
ही योजना प्रधानमंत्री खनिज विकास निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांचे माध्यमातून राबविण्यात येत असून, मोठ्या गाजावाजात सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आशाताईंना तातडीने देण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी नाम. वडेट्टीवार यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
याशिवाय कोरोणाचे संकट काळात फ्रन्टलाइन म्हणून गावात काम करणाऱ्या आशाताई आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने अतिरिक्त एक हजार रुपयांचे मानधन देण्याचे जाहीर केले. आतापर्यंत फक्त एका महिन्याचे मानधन मिळाले आहे. उर्वरित रक्कम अजून पर्यंत देण्यात आलेले नाही, ही रक्कम देखील तातडीने देण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणीही सिद्धावार यांनी केली आहे.