Top News

ऑनलाइन गेम्सच्या नादी लागून मुलं घरातून पळाली.

मुंबईला जाणाऱ्या तिघांना नाशिकमध्येचं अडवलं.
Bhairav Diwase.      Feb 14, 2021
नागपूर:- ऑनलाईन गेम्सच्या जाळ्यात अडकून अनेकदा लहान आणि किशोरवयीन मुलं टोकाचं पाऊल उचलतात. असाच प्रकार नागपूरमध्ये घडला आहे.

'फ्री फायर गेम'च्या नादी लागलेली नागपूरमधली तीन शाळकरी मुलं शनिवारी भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यानं मुलं रेल्वेतून मुंबईकडे जात असल्याचं लक्षात आलं. आरपीएफच्या मदतीनं संध्याकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं गेलं.

काही काळ मात्र या पालकांच्या काळजाचे ठोके चुकले होते. 15, 16, 17 वर्षे वय असलेली तिन्ही मुलं दहावीत शिकतात. ऑनलाईन क्लासच्या  नावाखाली हे तिघंही 'फ्री फायर' हा ऑनलाईन गेम खेळत होते. नेहमीप्रमाणंच ही मुलं शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी म्हणून बॅग घेऊन निघाली. मात्र बराच काळ परत आली नाही. त्यामुळं आई-वडिलांनी एकमेकांकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.


या मुलांपैकी एकानं आपल्या आईला सांगितलं होतं, की आपण 'फ्री फायर गेमची टूर्नामेंट खेळण्यासाठी मुंबईला जातो आहोत. आईनं त्याला यासाठी मनाईही केली होती. त्यावेळी त्यानं आपण आईचं ऐकलंय असं दाखवलं. सकाळी घरून निघताना या मुलानं बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचं आईच्या लक्षात आलं. त्यानंतर या मुलाचे आई-वडील दुसऱ्या मुलांच्या घरी गेले असता ही मुलंसुद्धा काही कळू न देता कपडे भरून निघून गेली असल्याचं कळालं.

आता यानंतर मात्र मुलं पळून गेल्याचा निष्कर्ष या पालकांनी काढला. पालकांनी लगेचच प्रतापनगर पोलीस ठाणं गाठलं. पोलीस पथकाला तातडीनं रेल्वे स्टेशनवर पाठवलं गेलं. नागपूर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही मुलं हावडा-मुंबई स्पेशल ट्रेनमध्ये बसल्याचं दिसलं. रेल्वे पोलीस, आरपीएफ अधिकाऱ्यांनी अकोला, जळगाव, नाशिक आणि मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. सायंकाळी गाडी नाशिक स्थानकात थांबताच आरपीएफनं मुलांना ताब्यात घेतलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने