Top News

तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक घेतला पेट.

Bhairav Diwase. March 27, 2021
कुरखेडा:- कुरखेडा येथील तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. यात जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे कारचे अतोनात नुकसान झाले आहे. ही घटना आज (दि. २७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

आरमोरी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांच्या मालकीची असलेली एमएच ३३ ए ३२१८ या क्रमांकाची कार स्वतः मारकवार चालवीत होते. दरम्यान मारकवार हे तहसील कार्यालयासमोर कार रस्त्याच्या कडेला उभी करून समोरच्या हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.

दरम्यान, महावितरणच्या कार्यालयात आयोजित शिवसेनेचे आंदोलन आटोपून परत येत असताना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना कारच्या इंजिनमधून ज्वाळा निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कार्यकर्त्यासह समोरच्या हॉटेलमधून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार दुसऱ्या बाजूने पेट घेत होती. थोड्यावेळाने नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाने आग विझवण्यात आली. परंतु तोपर्यंत वाहनाचे बरेच नुकसान झाले होते.

यावेळी पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुरखेडा-तळेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने