बापाला तिन दिवसाची पोलिस कोठडी.
शौचालयात आढळले होते मृत नवजात बाळ.
चिमूर उपजिल्हा रूग्णालयातील थरकाप उडविणारी घटना.
चिमूर:- चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातील शौचालयात आढळून आलेल्या सात महिण्याच्या नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणात त्याच बाळाच्या वडिलास अटक करण्यात आली आहे. रोशन बबन वाघमारे रा . कन्हाळगांव ता.चिमूर असे आरोपी बापाचे नाव आहे. गुरूवारी त्याला भादंवी 302, 318 कल्मान्वये अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तिन दिवसाच्या पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान घटनेची विस्तृत माहिती पोलिसांना काढता येणार आहे. समाजमन सुनन् करणाऱ्या या घटनेत वडिलच पोटच्या नवजात बाळाचा मारेकरी निघाला आहे.
रुग्णालयातील शौचालयात आढळले ७ महिन्याचे भृण (मृत बालिका).
https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_11.html?m=1 चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी 1 मार्च सकाळच्या सुमारास सफाई कामगार राजेश सुबराव शेट्टी शौचालयाची स्वच्छता करण्याकरिता गेला असता शौचालयात नवजात बाळ आढळून आले होते. वैद्यकीय अधिका-यांनी पहाणी केली असता बाळ मृतावस्थेत होते. सफाई कामगार राजेश शेट्टी याचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रूग्णालयातच शौचालयात नवजात बाळाला ठार करण्यात आल्याच्या या गंभीर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर ठार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयात टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्या पैलूंनी पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम वैदयकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच बाळाचे मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवालची प्रतिक्षा पोलिसांनी असताना उप जिल्हा रूग्णालयात लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेराची मदत घेण्यात आली. कॅमेरातील फुटेजवरून पोलिसांच्या हाती काही पुरावे आढळून आले. त्या आधारे बाळाच्या वडिलाला काल गुरूवारी (4 मार्च ) ला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेज मध्ये घटना उघडकीस येणाच्या आदल्या दिवशी रविवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील कन्हाळगांव येथील रोशन बबन वाघमारे व त्याची पत्नी आणि एक मुलगी रूग्णालयातील शौचालयाकडे जाताना दिसत आहेत. पत्नी शौचासाठी शौचालयात गेलेली असताना व पती आणि एक मुलगी शौचालयाबाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. शौचालयातच पत्नीला प्रसुतीच्या कळा आल्याने ती ओरडाओरड करू लागल्याने पतीने शौचालयात घुसतानाही दिसून येत आहे. त्यामुळे शौचलायातच बाळ जन्मास येवून त्याला शौचालयाच्या सिट मध्ये कोंबण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. काही वेळानंतर पत्नी, पती आणि एक मुलगी निघून गेल्याचे दिसून येत असल्याच्या सिसिटीव्ही फुटेजवरून नवजात बाळाच्या बापास अटक करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनुसार समजते. सदर घटनेच्या पूर्वीच त्या महिलेला रूग्णालयातून सुटी दिली आणि सात महिण्याच्या प्रसुतीत अडचण असल्याने योग्य ठिकाणी जावून उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र त्याच सायंकाळी घरी जाण्यापूर्वी त्या महिलेने शौचास गेल्यानंतर तिथेच बाळास जन्म दिला. नवजात बाळ मुलगी असल्याने वडिलाने शौचालयाचे सिट मध्ये तिला कोंबून तेथून पत्नी आणि एका मुलगीसह तेथून पळ काढला. शिवाय बाळाच्या अंगावर काचेच्या जखमा असल्याने बाळाला मारून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयातच टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे.
अटकेत असलेला आरोपी बाप रोशन बबन वाघमारे ह्याला एक मुलगा आहे. त्याला फिटेचा आजार आहे. एक मुलगी आहे. ती अधामधात आजारी असते. त्यामुळे आई वडिल हे नैराश्यात जिवन जगत होते. त्यांनंतर जन्मास आलेले तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने वडिलाने तिला शौचालयात कोंबून मारल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे आरोपी बापाने हा सन 2014 ते 2018 या कालावधीत चिमूर उपजिल्हा रूग्णालयाच कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सांभाळले आहे. शिवाय प्रसुती बाबत त्याला बरीच माहिती असल्याचे समजते. यावरून त्याने नवजात बाळाला रूग्णालयातील शौचालयात टाकल्याची माहिती आहे. समाजमन सुन्न होणाऱ्या घटनेची माहिती पोलिस तपास लवकरच पुढे येणार आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बगाटे यांचे नेतृत्वात सपोनि मंगेश मोहोड घटनेचा तपास करीत आहेत.