Click Here...👇👇👇

पोंभूर्णा पोलिस "ऍक्शन मोड" वर.

Bhairav Diwase
सतत दोन दिवसांपासून झाडाझडती; अवैध दारु विर्क्रेत्याचे धाबे दणाणले.
Bhairav Diwase.       March 19, 2021
पोंभूर्णा:- मागील आठवड्यात चेक ठाणेवासना (कवठी), नवेगांव मोरे आणि वेळवा माल गावातील महिलांनी प्रत्यक्ष पोलिस स्टेशन गाठत अवैद्य दारूविक्री बाबत लेखी निवेदने देत गावातील अवैद्य दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी विनंती केल्यानंतर पोंभूर्णा पोलीस लागलीच "ऍक्शन मोडवर" आल्याचे दिसत आहे. ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वात एक पोलिस पथक मागील दोन दिवसांपासून महिलांनी सांगितलेल्या अवैद्य दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकून घराची झाडाझडती घेत असल्याचे दिसत आहे. अजूनपर्यंत काहीच हाती लागले नसले तरी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे गावात सध्यातरी शांततेचे वातावरण आहे. 

जवान निखिल बुरांडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

           वेळवा माल गावात अवैद्य दारूविक्रेत्यांनी तर उच्छादच मांडला होता. आजुबाजुच्या सहा-सात गावातील दारूचे आंबट शौकीन वेळव्यात शौक भागवायला तर येत होतेच, शिवाय तेवढ्याच गावातील शौकीनांना फोनवरून घरबसल्या सेवा पुरविली जात होती. पोंभूर्णा पोलिस स्टेशन पासून अवघ्या ४ किमी. अंतरावर हे गाव असल्याने पोलीसांना सगळंच माहीत असुन पोलीस हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांकडून केला जात होता. एवढेच नव्हे तर दोन पोलिस कर्मचारी अवैद्य दारू विक्रेत्यांच्या घरी भेट देऊन जात असल्याचे महिलांनी ठाणेदाराच्या निदर्शनास आणून दिले होते. 

          मागील दोन दिवसांपासून वेळवा गावातील अवैद्य दारू सध्या भूमिगत झाल्याचे दिसत असली तरी आदमखोरा वाघावर एवढ्या लवकर पूर्णपणे भरोसा करणे कठीण आहे. घाम न गाळता घरी बसल्या मिळणाऱ्या पैशांची चव काही औरच असते. प्रसार माध्यमांनी हा विषय ताकदीने लावून धरल्याने, सध्या वातावरण गरम असुन पोलीस ऍक्टिव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुजोरी करण्याची ही वेळ नाही असे समजून अवैद्य दारू विक्रीवाले शांत बसले असू शकतात. ठाणेदार धर्मेंद्र जोशींना पोंभूर्णा पोलीस स्टेशनला येऊन जेमतेम पंधरा दिवस होत आहेत. आल्याआल्याच अवैद्य दारूविक्री संदर्भात तालुक्यातील महिलांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत असल्याने हा विषय पाहिजे तेवढा सोपा नसल्याचे त्यांच्याही लक्षात आले असेलच. दैनंदिन कामकाजा व्यतिरिक्त तालुक्यातील महिलांच्या अपेक्षांना ते कसे हाताळतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

खास करून महिला ग्रामसंघ व बचत गटाच्या महिलांनी हा विषय ऐरणीवर आणला आहे. प्रसार माध्यमांनीही हा विषय चांगल्यातऱ्हेने लावून धरत महिलांना एक प्रकारे सहकार्यच केल्याने महिलांचेही मनोबल उंचावल्याचे दिसून येत आहे. बचत गटाच्या कामकाजांनी ग्रामीण भागातील  महिलांना घराबाहेर पडण्याची संधीच नाही, तर चार कार्यालये फिरून, अधिकाऱ्यांना स्वयंभूपने तोंड देत चर्चा करण्याची हिंमत सुध्दा दिली आहे. आता बचत गटाच्या महिला अवैद्य दारूबंदी हा विषय कुठंपर्यंत पुढे नेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. महिला सतत कार्यरत राहील्या तर गावातील अवैद्य दारूविक्रेत्यांच्या नाकात धम करत त्यांना "सळो की पळो" करून सोडतील असेच काहीसे चित्र सध्या उदयाला येतांना दिसत आहे. अर्थातच पोलिसांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम पुढे जाणार नाही, हे तितकेच खरे..!