Top News

कोरोना कॉल सेंटर कार्यान्वित 07172-274161 व 07172-274162 हेल्पलाईन क्रमांक नागरिकांच्या सेवेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णालयातील उपलब्ध बेडची मिळणार माहिती.

Bhairav Diwase.      April 10, 2021

चंद्रपूर:- जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून कोरोना बाधित रुग्णांना जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील बेडची उपलब्धता, लसीकरणाचे स्थळ व कोरोना आजाराबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनामार्फत 07172-274161 व 07172-274162 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. गरजूंनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेडची उपलब्धता याबाबतची माहिती नागरिकांना जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चंद्रपूर ऑनलाइन हे ॲप कार्यान्वीत करण्यात आले आहे तसेच नागरिकांना Chanda.nic.in या वेबसाईटवरून सुद्धा रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती जाणून घेता येईल.

त्यासोबतच कोरोना कॉल सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांना तसेच नव्याने  कोरोना बाधित आढळून आलेल्या  रुग्णांना दैनंदिन फोन द्वारे त्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेत त्यांना योग्य मदत व मार्गदर्शन जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

जिल्ह्यात उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगात हजारोच्या संख्येने काम करणारा कामगार वर्ग आहे. त्यादृष्टीने उद्योग व्यवसायातील अधिकारी-कर्मचारी व कामगार यांना कोविड आजाराच्या तपासणी बाबत योग्य माहिती देत मोबाईल टिमद्वारे सदर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात येत आहे.

कोरोना सारख्या अचानक उद्भवलेल्या या आपत्तीमुळे जनसामान्यांमध्ये मानसिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे  रुग्णांचे आणि बाधित नसणाऱ्याचेंही मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समुपदेशक या कॉलसेंटरच्या माध्यमातून फोन कॉल द्वारे रुग्णांचे समुपदेशन करीत असतात.

कोरोना लसीकरणाचे काम ही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने ‌ कार्य करीत आहे.

सदर कॉल सेंटरमध्ये  शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभागातील कर्मचारी, खाजगी शाळेतील शिक्षक तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असे एकूण 44 कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत.

दैनंदिन कार्याचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा पाठपुरावा व कार्यवाही योग्य रीतीने पार पाडली जात आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने