Top News

भावाला बघता आलं नाही बहिणीचं लग्न, पत्रिका वाटायला गेला अन्.......


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरची:- बहिणीचे लग्न जुळले. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. साखरपुडा उरकला आणि अवघ्या काही दिवसांवर म्हणजे १४ एप्रिलच्या मुहूर्तावर बहिणीचं लग्न होते. बहिणीचे लग्न असल्यामुळे भाऊ अत्यंत खुश होऊन लग्नाच्या तयारीला लागला. चुलत भावांना घेऊन पत्रिका वाटायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं. बहिणीला बोहल्यावर चढताना पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

कोरची येथून २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील एक युवक आपल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून परत येत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला, तर सोबत असलेले इतर दोघे गंभीर जखमी झाले.

मृत युवकाचे नाव पवन केजाराम देवांगन (वय २५) असून गंभीर जखमींमध्ये प्रमोद करंगसू देवांगन (वय २४) व जागेश्‍वर पंचराम देवांगन (वय १९, रा. कोचीनारा) यांचा समावेश आहे. बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर मोटारसायकलचा तोल जाऊन हा अपघात घडला.

अत्यंत गरीब कुटुंबातील पवन देवांगन याच्या बहिणीचे लग्न १४ एप्रिल रोजी आहे. बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून तो चुलत भावांना घेऊन परत येत होता. यावेळी बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर त्याच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडून अपघात घडला. यात पवन देवांगनाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी गडचिरोली येथे हलविण्याची कार्यवाही सुरू होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने