Top News

तक्रार केली म्हणून कामावरून काढले, वाहनचालकांचा आरोप; गोपानी कारखान्याची मुजोरी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर या कारखान्यातील वाहनचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच जात नसल्याची तसेच ८ तासांपेक्षा जास्त काम घेतल्या जात असल्याची रितसर तक्रार कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली होती. त्यामुळे व्यवस्थापनातर्फे चिडून कामावरून कमी करण्यात आले असा आरोप कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आला आहे.

ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर या कारखान्यात चंद्रप्रकाश डहाट व अशोक कोटा हे मागील अंदाजे १६ वर्षांपासून तर जालिंद्र उर्फ जीतू दुर्गे हे मागील १० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासून वाहनचालक (ड्रायव्हर) या पदावर कार्यरत होते. मात्र आजतागायत कारखान्याने या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच नाही. कर्मचार्‍यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा पीएफ भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले.

तसेच या वाहनचालकांकडून दररोज ८ तासांपेक्षा जास्त काम करवून घेतल्या जात होते. त्यांची ड्युटी शिफ्टच तशी लावण्यात येत होती. वारंवार विनंती करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त व ईपीएफओ विभाग चंद्रपूर यांच्याकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली होती.

कर्मचाऱ्यांना १ एप्रिल पासून नोकरीवर येण्यास कारखान्याने मज्जाव केला आहे. कर्मचाऱ्यांनी विरोध करू नये म्हणून १ एप्रिल पासून काही दिवस अतिरिक्त सुरक्षारक्षकांचा बंदोबस्तही व्यवस्थापनाकडून ठेवण्यात आला होता.

कामावरून कमी केल्यानंतर लगेच १ एप्रिल रोजी तशी लेखी सुचना सहाय्यक कामगार आयुक्त व ईपीएफओचे अधिकारी यांना कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली. प्रकरणाची चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत कामावरून काढू नये अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.


कारखान्याला आम्ही नोटीस पाठवली आहे. हे कंत्राटी कर्मचारी आहेत असे कारखान्याचे म्हणणे आहे. मात्र हे कारखान्याला सिध्द करावे लागेल. कोरोनामुळे ३० एप्रिल पर्यंत बैठक घेवू शकत नाही. नंतर बैठक घेवून हे प्रकरण सोडविण्यात येईल.
नितीन पाटणकर
सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने