गैरसमज पसरविण्यापेक्षा एसटी कामगारांच्या समस्या सोडवा. #Chandrapur


आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला आवाहन.
चंद्रपूर:- एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पंधरवडा पूर्ण होत आला आहे. या कामगारांची दिवाळी तशीच अंधारात गेली आहे. अशा स्थितीत सरकारला असलेल्या अधिकारांच्या जोरावर, या समस्यांवर शासकीय पातळीवर सोडविण्याची गरज असताना, मंत्र्यांसह सारी यंत्रणा जुन्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करून गैरसमज पसरविण्यात गुंतलेली दिसते आहे. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. जुन्या व्हिडिओ क्लिपच काढायच्या असतील तर शरद पवार, धनंजय मुंडे यांनी कधीकाळी केलेल्या मागण्या, एसटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सुचविलेल्या उपाय योजना, यांचीही जुनी वक्तव्ये ऐकता येतील. तीच सारी मंडळी आता सत्तेत आहे. या मंडळींनी राजकारणात वेळ न दवडता, समस्यांवर उपाय योजून, संप संपवून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी राज्याचे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, संपाबाबत महाराष्ट्रातील विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणावर तीव्र संताप‌ व्यक्त केला. कधीकाळी मा. शरद पवार यांनी, एसटी कामगारांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतन, भत्ते व अन्य सुविधा देण्याबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली होती. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कितीतरीदा एसटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रखर भूमिका मांडली आहे. मग आता सत्ता हाती असताना, त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे एसटी कामगार आंदोलन पुकारतात आणि सामान्य जनतेला त्याची झळ सोसावी लागते, असे का घडावे, असा सवालही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केला.
सध्या समाजमाध्यमात फिरत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या एका व्हिडिओ क्लिपबाबत विचारले असता, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा व्हिडिओ अर्धवट दाखवून, एसटी कामगारांच्या सरकार मधील विलीनीकरणाच्या मुद्यावर अकारण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचे ते म्हणाले. या कामगारांना महामंडळाऐवजी राज्य सरकारच्या कामगारांचा दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी काही कायदेशीर तरतुदी पूर्ण कराव्या लागतील असे आपण, म्हटले होते. आजही, सरकारने त्या बाबींची पूर्तता करून, एसटी कामगारांच्या समस्या निकाली काढाव्यात अशीच आपली भूमिका असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत