स्वच्छ सर्वेक्षणात चंद्रपूरला"थ्री स्टार" #Chandrapur


हा सन्मान महानगरपालिकेचा नव्हे, तर सर्व चंद्रपूरकरांचा:- महापौर राखी कंचर्लावर.
चंद्रपूर:- स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१ मध्ये उत्तम कामगिरी बजावत चंद्रपूर महानगरपालिकेने "थ्री स्टार" मानांकन पटकाविले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात महापौर राखी संजय कंचर्लावार, तसेच आयुक्त राजेश मोहिते यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
१ ते १० लाख लोकसंख्येच्या १०० युलबी आधारीत महानगरपालिका गटात देशातील २० शहरातून चंद्रपूर शहर ११ व्या क्रमांकावर आले आहे. सर्वेक्षणात देशभरातील ३७२ मनपांनी सहभाग घेतला होता. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीने चंद्रपुरातील विविध स्थळ आणि परिसराची पाहणी केली. हा दौरा प्रशासनाला कोणतीही माहिती न देता केला. विशेष म्हणजे नागरिकांशी चर्चा करून आणि मनपा प्रशासनाने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे तपशील जाणून घेतले होते. गोंडपिपरी नगर पंचायतने घनकचारा व्यवस्थापनात उत्तम काम केल्याने पूरस्काराचा मानकरी ठरला. ब्रह्मपुरी नगर परिषदेने जीएफसी मानांकन यादीत यंदा स्थान पटकावले आहे.
सिटीझन फिडबॅक गटात मूल न.प. प्रथम.....

सिटीझन फिडबॅक गटात मूल नगरपरिषद प्रथम स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम झोनमधून सिटीझन फिडबॅक गटात मूल नगरपरिषदला प्रथम मानांकन मिळाला. या नगरपरिषदला २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये तिसरा, २०२० मध्ये ११ आणि २०२१ मध्ये २३ वा मानांकन मिळाला आहे.
सावलीने केली प्रगती.....

सावली नगरपंचायतीने गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगीरी केली. मागील वर्षी ३२३ असा स्कोअर होता. यंदा मोहिम उत्तम राबविल्याने १३९ झाला आहे. त्यामुळे दिल्ली येथे मुख्याधिकारी मनिषा वझाडे यांना पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळाली.
बल्लारपूरही अव्वल.....

बल्लारपूर नगरपरिषदनेही स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबवून सस्टेनेबल शहर गटातून पहिला क्रमांक मिळविला. नगराध्यक्ष हरिश शर्मा व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छता मोहीम राबविण्याकडे मनपाने विशेष लक्ष दिले. त्यामुळे हे यश मिळाले. विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना केंद्रीय निकषानुसार मोहीम राबविण्यात आली. हा सन्मान महानगरपालिकेचा नव्हे, तर सर्व चंद्रपूरकरांचा आहे.
राखी कंचर्लावर,
महापौर, चंद्रपूर
स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे चंद्रपूरला सर्वेक्षणानुसार थ्री स्टार मिळाले. स्वच्छता मोहीम पुन्हा प्रभावीपणे राबविण्यात येईल. मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराला थ्री स्टार श्रेणी प्राप्त होऊ शकली.
राजेश मोहिते
मनपा आयुक्त, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत