खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी. #Death


संतप्त युवकांनी अपघातग्रस्त ट्रकला लावली आग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावासमोर असलेल्या खड्ड्यांमध्ये मोटारसायकल उसळल्याने अल्का भास्कर गोखरे (४५) या खाली पडल्या. त्याच वेळी मागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वरोडा वस्तीनजीक बुधवारी सकाळी ८:३० वाजता घडली.
नागरिकांनी व मृताच्या नातेवाईकांनी कुटुंबियांना नुकसानभरपाईची मागणी करत सात तास वाहतूक रोखून धरली. बराच वेळ तोडगा न निघाल्याने वातावरण चिघळले व संतप्त युवकांनी अपघातग्रस्त ट्रकला आग लावली. त्यात ट्रकचा समोरचा भाग जळाला आहे.
भारोसा येथील अल्का गोखरे या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील बहिणीकडे जात होत्या. वरोडा या गावाजवळ मोठ-मोठे खड्डे पडून असल्याने मोटारसायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या हायवा ट्रक (क्रमांक एमएच ३४ एन १५७१) अल्का यांच्या अंगावरून गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर नागरिकांनी वाहतूक रोखून धरली व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. संतप्त युवकांनी अपघातग्रस्त ट्रकला आग लावली. काही तासांनंतर राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृताचे नातेवाईक व नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी, याकरिता ट्रकमालकांशी संपर्क केला.
दरम्यान, घटनास्थळी अग्निशमनची गाडी पोहोचून आग आटोक्यात आणली. त्यात ट्रकचा समोरील काही भाग जळाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत