मुंबई:- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केलीय. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवारांचा तो व्हिडीओ ट्विट केला आहे. या आरोपाला आता स्वत: सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
आ. सुधीर मुंनगंटीवारांचं प्रत्युत्तर काय?
माझ्या मतदारसंघांत एक कार्यकर्ता आला होता. त्यांनी मला निवेदन दिलं होतं. मतदार म्हणून तुम्ही इथले आमदार आहात तर भूमिका घ्या, विलीनीकरण तुम्ही करू शकता का? पण विलीनीकरण अर्थ खातं करू शकत नाही. त्यासाठी परिवहन विभाग आणि एसटीचा प्रस्ताव लागतो. तो अर्धवट व्हिडिओ दाखवला आहे. तिथे मला कुणीही शिष्टमंडळ घेऊन आला नव्हता. मी आजही सांगतो की मी विलीनीकरणाच्या बाजूने आहे. अर्थमंत्री म्हणून एसटीला सर्वात जास्त मदत मी केली आहे. तो कॅपिटल कर आहे त्यासंदर्भात मदत केलीय. 100 च्या वरती बस स्थानक बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. नवीन बस घेण्यासाठी पैसे दिले आहेत. तेजस्विनी बस ज्या आज आपण पाहत आहोत, त्यासाठी अर्थमंत्री म्हणून मी पैशाची तरतूद केली. त्यावेळी 24 कॅरेटच्या विचारांची शिवसेना आणि भाजपची युती होती, असं मुनगंटीवार म्हणाले.
आज सरकारला प्रश्न सोडवायचा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा मागवा. या जाहीरनाम्यात काय आश्वासन दिलं आहे. आम्ही एसटीचं विलीनीकरण करू असं स्पष्ट सांगितलं. आता भ्रम का निर्माण करत आहेत. माझा संबंध याविषयी येत नाही. एसटी कामगार कोणाकडे मागणी करत आहेत तर परिवहन मंत्र्याकडे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी संगनमत केलं. आता त्यांची मती भ्रष्ट झाली आहे. त्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा आणि प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केलीय.
31 पेक्षा जास्त एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या. जगण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे. एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यांना फक्त अडीच हजार बोनस देता, मग स्वाभाविकच त्यांच्याकडून मागणी होणार, असं मुनगंटीवार म्हणाले.
व्हिडीओची सुरुवात नेमकी कशी?
व्हिडीओची सुरुवात अशी होती, भाऊ तुम्ही आमचे आमदार आहात, तुम्ही करा. मी ह्या भागाचा आमदार असलो आणि तुम्ही मतदार असला तरी मला हे शक्य नाही. हे विलीनीकरण कायद्याने करावे लागते, असं आपण म्हणाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. दरम्यान, भाजपने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की, एसटी कामगारांच्या 35 आत्महत्या झाल्यात. डू ऑर डाय अशी एसटी कामगारांची परिस्थिती आहे. त्यामुळे विलीनीकरण झालं पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.
‘एकत्र येऊन निर्णय घ्या, आम्ही मदतीला तयार’
परिवहन मंत्र्यांशी मी व्यक्तिगत बोललो आहे. तुमच्या माध्यमातून सांगत आहे हे पद तात्पुरत आहे. सर्वांनी एकत्र घेऊन निर्णय घ्या, आम्ही मदत करायला तयार आहोत. एसटीमध्ये संचित घोटाळा नाही, संचित तोटा आहे. तो ऊर्जा विभागातही आहे, त्यामुळे एसटी कामगार पेटून उठला आहे. अर्धवट व्हिडिओ टाकून थट्टा करू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.