Top News

१२ नोव्हेंबरला नगरपंचायतीची आरक्षण सोडत. #Nagarpanchayat

सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत निवडणुकीचे पडघम.
चंद्रपूर:- सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
येत्या १२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेशही जारी केले.
सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले. सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी मूल, पोंभुर्णासाठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरीसाठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा आणि जिवतीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हे आरक्षणसोडतीसाठी नियुक्तलेले पीठासीन अधिकारी आहेत.
आरक्षण सोडत शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने