जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून #Murder

लग्नास नकार दिल्याचा मनात राग

भंडारा:- लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला घरच्यांनी नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा तरुणावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
शिल्पा तेजराम फुल्लुके (१९) रा. मऱ्हेगाव ता. लाखनी असे मृत तरुणीचे नाव आहे. तर नयन विश्वनाथ शहारे (१९) रा. पालांदूर असे आरोपीचे नाव आहे. शिल्पा ही पालांदूर येथील संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. सोमवारी तिला पाहण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील पाहुणे येणार होते. त्यानिमित्ताने ती खरेदी करण्यासाठी घरून सकाळी ११ वाजता निघाली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिचा पालांदूर-अड्याळ रस्त्यावरील कब्रस्तानजवळ मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ चाकू आणि विषाची बाटलीही सापडली. त्यामुळे या घटनेचे गुढ वाढले.
पालांदूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. शिल्पाच्या डाव्या हाताची नस कापल्याने रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही नस खोलवर कापली गेल्याने तिने स्वत: कापली नसावी, असा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिचे पालांदूर येथील एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याचे पुढे आले. तसेच आठ दिवसापुर्वी नयन शिल्पाच्या घरी लग्नाची मागणी करण्यासाठी गेला होता. परंतु त्याला नकार दिल्याने त्याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र वायकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान आरोपी नयन शहारे याला ताब्यात घेतले. चौकशीअंती रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी शिल्पाची आई शिला तेजराम फुल्लुके यांनी तक्रार दिली. या घटनेचा तपास पालांदूरचे ठाणेदार तेजस सावंत करीत आहे.
नयनने सकाळीच घेतला चाकू विकत.....

गत चार-पाच वर्षापासून प्रेम असलेल्या शिल्पाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने नयनने खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने सोमवारी सकाळी एक चाकूही विकत घेतला. याच चाकूने शिल्पाच्या हाताची नस कापून तिचा खून केला. एवढेच नाही तर त्याने खून कसा करावा याबाबत व्हिडीओ बघितल्याचीही माहिती पुढे आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत