जाहिरात... Advertisement... विज्ञापन

"थेरगाव क्लीन" चा साथीदार "भाई" अटकेत; म्हणाला, असे व्हिडिओ परत नाही करणार... #Arrested

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'थेरगाव क्वीन'च्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या. अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा व्हिडिओ व्हायरल करणारा या 'भाई'ने गयावया करत माफी मागितली. असे व्हिडिओ परत करणार नाही, असेही तो म्हणाला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.

कुणाल राजू कांबळे (वय २६, रा. नाडे गल्ली, गणेशपेठ, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन तरुणींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेली थेरगाव येथील तरुणी ही इन्स्टग्राम या मोबाईल अ‍ॅप्सवर 'थेरगाव क्वीन' नावाचे अकाउंट चालवते. या तरुणीने आरोपी कुणाल कांबळे आणि आरोपी तरुणीसोबत व्हिडिओ तयार करून व्हायरल केले. या व्हिडिओमध्ये धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजातील मुला-मुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत होत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 'थेरगाव क्वीन' हे अकाउंट चालविणाऱ्या तरुणीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यातील आरोपी कुणाल कांबळे याच्या मागावर पोलीस होते. आरोपी कुणाल हा जंगली महाराज रोड, चौपाटी, शिवाजीनगर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पाेलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, स्वप्नील खेतले, दत्तात्रय गोरे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, जालिंदर गारे, सचिन गोनटे, मारुती करचुंडे, राजेकश कोकाटे, गणेश कारोटे, दीपक शिरसाट, अतुल लोखंडे, सुमित डमाळ, योगेश तिडके, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेशमा झावरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
झिंग उतरली, भाषा नरमली

'थेरगाव क्वीन' या अकाउंटवरून धमकीवजा, अश्लील भाषेचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा आरोपींनी धडाका लावला होता. त्यामुळे सोशल मीडियाचा वापरकर्त्यांना त्याचा नाहक त्रास होत असे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या हिसक्यानंतर आरोपींची 'आभासी दुनियेची' झिंग उतरली आणि त्यांची भाषाही नरमली. पोलिसांच्या या कारवाईचे सोशल मीडियातूनही कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत