Top News

अचानक समोर दिसले चार वाघ, दुचाकीस्वार रस्त्यावरच कोसळला अन्.... #Tiger

गडचिरोली:- वाघ समोर दिसला की माणूस पुरता गर्भगळीत होऊन जातो. पण एक, दोन नव्हे तर चक्क चार वाघ अचानक समोर दिसले तर काय अवस्था झाली असेल याची कल्पना केली तरी थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
कोंढाळ्याजवळ शुक्रवारी सायंकाळी असाच एक प्रसंग घडला आणि घाबरल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुचाकीस्वार रस्त्यावरच कोसळला. विशेष म्हणजे या अपघातानंतर वाघ त्या व्यक्तीवर हल्ला न करता आपल्या वाटेने निघून गेले.
अशोक नाकतोडे (५८ वर्ष) रा. नैनपूर असे त्या जखमी इसमाचे नाव आहे. आश्रमशाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेले नाकतोडे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आरमोरीकडून बाईकने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, मुख्य मार्गावरील कोंढाळा गावापासून १ किलोमीटर आधी वाघिणीचे चार बछडे रस्ता ओलांडत असल्याचे त्यांना दिसले. हे बछडे आता बऱ्यापैकी मोठे झाले असल्यामुळे ते आईपासून थोडे लांब राहत असतात. यावेळी वाघिणही तिथे होती, पण ती रस्ता ओलांडून पुढे निघून गेली होती आणि ४ पिले मागे राहिली होती.
काळ आला होता, पण...

चार वाघांना समोर पाहताच अशोक नाकतोडे चांगलेच घाबरून गेले. त्यांनी पूर्ण ब्रेक दाबून बाईक थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते बाईकसह कोसळले. त्यामुळे त्यांना चांगलेच खरचटून डोक्यालाही मुका मार लागला. यानंतर चारही पिले नाकतोडे यांना कोणतीही इजा न करता आपल्या वाटेने निघून गेली. काळ आला होता, पण वेळ नाही, याचा प्रत्यय त्यांना या प्रसंगातून आला.
काही वेळानंतर आरमोरीकडून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या चालकाने नाकतोडे यांना देसाईगंजला उपचारासाठी नेले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला पाठविण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मुख्य मार्गावरच ही घटना घडल्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने