Top News

महिलांना उद्योग सुरु करण्याकरीता नगर परिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल #bhadrawati

नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची ग्वाही
भद्रावती:- महिलांना उद्योग सुरु करण्याकरीता नगर परिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी येथील महिला पतंजली योग समिती तर्फे येथील हुतात्मा स्मारक प्रांगणात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात दिली.


ते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जर महिलांना उद्योग सुरु करायचे असेल तर नगर परिषद त्यांना जागा उपलब्ध करुन देईल. तसेच आर्थिक सहकार्य सुद्धा करेल. महिलांनी वयक्तिक किंवा बचतगटांमार्फत तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीची जबाबदारी नगर परिषद घेईल. तसेच दोन महिलांना ई-रिक्षा सुद्धा देण्यात येईल. नगर परिषद तर्फे उभारण्यात आलेल्या जनकल्याण केंद्राशी साडे चार हजार महिला जुळल्या असून इतर महिलांनी सुद्धा या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहनही धानोरकर यांनी यावेळी केले. हुतात्मा स्मारकात सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचा लाभ महिलांनी घ्यावा तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा लाभ युवक-युवतींना घेण्यास सांगावे असेही आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन चांदा आयुध निर्माणीच्या वुमेन वेलफेअर्सच्या अध्यक्षा अनिता कुमारी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली महिला योग समितीच्या तालुका महिला प्रभारी आशाताई देवाळकर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पतंजली महिला योग समिती जिल्हा प्रभारी स्मिता रेबनकर, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, वरोरा पो.स्टे.च्या समुपदेशिका योगिताताई लांडगे, डॉ. प्रिया शिंदे , डॉ मयुरा अवताडे, डॉ . श्वेता शिंदे, ॲड. उल्काताई पद्मावार आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करण्या-या महिला कांचन थुल, संगिता बांबोळे, डॉ. शिवानी बेलखेडे, प्राजक्ता पेटकर, उर्मिला बदखल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध वार्डातील योग वर्गाच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलभाताई मद्दीवार यांनी केले. सुत्रसंचालन सरिता सातपुते व कु. आकांक्षा आवारी यांनी केले. तर आभार सुनंदा खंडाळकर यांनी मानले. या कार्यक्रमात ४०० ते ५०० महिलांनी सहभाग दर्शविला. सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता अडबोल, शिशिर सातपुते, सौ.कावळे, श्रीमती गिरडकर,  कल्पनाताई आवारी,  प्रकाश आस्वले, सुनील वैद्य, विपुल ठक्कर, रवी भोयर , अनंत आखाडे , विभा बेहरे, प्रिती कांबळे, अनंत मते, विजय डंभारे , साई नान्ने व योग परिवारातील सर्व महिला व पुरुषांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने