Top News

2 पोलीस कर्मचाऱ्यांना 50 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ #arrested अटक


राजुरा:- राजुरा येथील उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे रायटर व गाडी चालक या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सुमारे 50 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे लाच घेतलेल्या एका आरोपीच्या दुचाकी मधुन सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. राजुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
एका दारू व्यावसायिकाला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांनी 50 हजाराची लाच मागितली होती. याविषयी तक्रार मिळताच नागपुर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने साफळा रचला. उपविभागीय कार्यालया बाहेर असलेल्या चहाच्या टपरी वर 50 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात 2 लाख 60 हजार रुपयांची रक्कम मिळाली. आरोपी राजेश त्रिकोलवार, वय 52 आणि सुधांशू मडावी, वय 40 या दोघांना रंगेहाथ अटक केली. राजेश हे डीवायएसपी चे रायटर असून सुधांशू हा वाहन चालक आहे.
या दोन्ही पोलिसांकडे एवढी मोठी रक्कम सापडल्याने येथे खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. यात अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे प्राप्त माहितीनुसार दुचाकित सापडलेल्या रक्कमेसोबत ज्यांच्या कडून रक्कम वसूल केली आहे आणि अजून रक्कम गोळा करायची आहे, त्यांची यादी सापडल्याची माहिती आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा तपासात उलगडा होईल. रात्री 8 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली नाही. नागपुर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप पोलीस अधीक्षक श्रीमती चाफले आणि त्यांचे कर्मचारी वृंद कार्यवाही करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने