जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखण्यात यश #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- मुल व वरोरा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर मिळाली. त्याअनुषंगाने सदर बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन टीमने जिल्हा बाल संरक्षण कक्षास दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन, चंद्रपूर यांच्या सतर्कतेने सदर बालविवाह थांबविण्यात आला.
चाईल्ड लाईन, चंद्रपूरच्या संचालिका नंदा अल्लूरवार, सरचिटणीस प्रभावती मुठाळ यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर चाईल्ड लाईनने संबंधित गावातील ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी केंद्र येथून अल्पवयीन बालिकेचा वयाचा पुरावा प्राप्त केला. या पुराव्याच्या आधारावर दोन्ही प्रकरणात मुल व वरोरा येथील पोलिस विभागाच्या सहकार्याने सदर टीमने स्वतः उपस्थित राहून कार्यवाही पार पाडली. अल्पवयीन बालिकेचे व तिच्या पालकांचे समुपदेशन करून मुलीला व मुलीच्या पालकांना बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित करण्यात आले.
सदर केसमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन,चंद्रपुर टीमच्या सदस्या चित्रा चौबे, कल्पना फुलझेले, प्रदीप वैरागडे, प्रणाली इंदुरकर, नक्षत्रा मुठाळ, समुपदेशिका दिपाली मसराम, चाईल्ड लाईन चंद्रपूरचे समन्वयक अभिषेक मोहुर्ले, पोलीस विभाग आदींचे सहकार्य लाभले.
जिल्ह्यात होत असलेले बालविवाहासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गोपनिय ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईन, चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत