Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मनपाची परवानगी न घेता होर्डिंग लावल्यास दंड आकारा #chandrapur


महापौरांच्या सूचनेनंतर स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष संदीप आवारी यांचे निर्देश
चंद्रपूर:- शहरात अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे इ. लावून विद्रुपीकरण केले जाते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करण्याची तरतूद आहे. मनपाची परवानगी न घेता शहरात अनधिकृत फलक (होर्डिंग), फ्लेक्‍स, बॅनर लावून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर दंड आकारला जावा, अशी सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली. त्यानुसार फ्लेक्‍स, बॅनर लावून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर दंड आकारणी करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष संदीप आवारी यांनी दिले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ता. २८ एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ अन्वये महानगरपालिका हद्दीमध्ये जाहिरात फलकांना परवानगी व नुतनीकरण देण्यात येते.
महानगरपालिकेकडून वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार जाहिरात शुल्क वसुली करण्यात येते. त्याचबरोबर अनधिकृत जाहिरात फलकाबाबत ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अनधिकृत पोस्टर्स,बॅनरबाजी मुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते. किंबहुना, वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने दिलेल्या सुचनांनुसार महानगरपालिकेने यापूर्वीच जाहिरात फलक धोरण बनवले आहे. त्यानुसार, परवानगीशिवाय बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय आक्षेपार्ह बॅनर लावणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना देण्यात आली. त्यांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी केली.
चौकांमध्ये अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावलेले चित्र पहायला मिळते. बेकायदा होर्डिंग लावल्यास त्या फलकांवरील व्यक्‍तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. शहरातील सर्व ग्राफिक्स डिझाईन व्यावसायिकांना नोटीस बजावून नियमांचे पालन करण्याच्या सूचना द्याव्या तसेच मनपाची रीतसर परवानगी घेऊन होर्डिंग, बॅनर, बोर्डवर परवानगी क्रमांक आणि एकूण संख्या नमूद करण्यात यावी असेही याप्रसंगी सूचित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत