Click Here...👇👇👇

हजारो माजरीवासियांनी दिली रेल्वे मार्गावर धडक

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आपल्या विविध मागण्यांना घेऊन भद्रावती तालुक्यातील माजरी येथील नागरिकांनी स्थानिक रेल्वे मार्गावर येऊन रेल्वे  व वेकोलि विरोधात संताप व्यक्त केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
       दि.१४ मे रोजी माजरीत रेल्वे आणि वेकोलि  प्रशासन लोकांची घरे पाडायला येणार ही माहिती माजरीवासियांना मिळताच सर्व माजरीवासिय नागरिक एकत्र आले. पहाता-पहाता जवळपास एक हजाराच्या वर नागरिक स्थानिक रेल्वे मार्गावर गोळा झाले. यावेळी व्यापारी संघटना, सर्व राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शनिवारी आंबेडकर वार्ड ते मुन्ना हॉटेल पर्यंत जमा होत गेले. त्यानंतर माजरी संघर्ष समिती आणि व्यापारी संघटना यांच्या पुढाकाराने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने माजरी परिसर दणाणून गेला.   
       यावेळी रेल्वे व वेकोलि प्रशासनाच्या विरुद्ध घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. हा जनआक्रोश मोर्चा रेल्वे लाइनजवळ मुन्ना हॉटेल येथून काढण्यात आला व माजरीतील मुख्य मार्गाने फिरुन आंबेडकर वार्ड, तेलुगु दफाई,सिद्धार्थ वार्ड येथून भ्रमण करत मुन्ना हॉटेल येथे परत पोहोचला.
      मोर्चात संतप्त महिला, नागरीक, युवकासह अबालवृद्ध हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान माजी जी.प.सदस्य प्रवीण सुर, व्यापारी संघटनेचे उल्हास रत्नपारखी, भारतीय मुस्लिम परिषदचे अशरफ खान, माजरीच्या सरपंच  छाया जंगम, माजी सरपंच श्रीकृष्ण वनकर, सामाजिक कार्यकर्ते रवी राय यांनी रेल्वे प्रशासना विरुद्ध हा लढा असून पीडित नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असे आपल्या भाषणात सांगितले.
       या जनआंदोलनाला आता माजरीतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी पूर्ण ताकदीने समर्थन दिले असल्याने सदर जनआंदोलन उग्र रूप धारण करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.