Top News

लग्न समारंभ आटाेपून निघालेल्या वऱ्हाडाचे भरधाव वाहन उलटले #chandrapur

एटापल्ली : गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथील लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडाचे पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात २४ जण जखमी झाले. त्यातील काहीजण वाहनाखाली दबल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी (दि. १) रात्री ९ वाजेच्या सुमारास एटापल्लीपासून १० किलोमीटरवर असलेल्या बारसेवाडा गावाजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्लीपासून जवळच असलेल्या वासामुंडी येथील नागरिक गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. तेथून पिकअप मालवाहू वाहनाने ते परतीच्या प्रवासात होते. दरम्यान, बारसेवाडा गावाजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन उलटले. त्यामुळे २४ जण जखमी झाले. त्यात १३ पुरुष, दोन महिला, आठ मुली आणि एक १२ वर्षांचा मुलगा आदींचा समावेश होता.
एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डाॅ. जया धातुरकर व सर्व कर्मचाऱ्यांनी तत्काळ सेवा दिली. सात जणांना रात्री १२ वाजेनंतर अहेरी येथे रेफर करण्यात आले. यात दोन महिला व चार मुली, एका युवकाचा समावेश आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदतीचा हात....

अपघाताची माहिती होताच काँग्रेससह शिवसेना, भाकप व इतर पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार यांनी रुग्णालयात येऊन रुग्णांना शक्य ती मदत केली. रुग्णांना आणण्यासाठी वाहने पाठविण्यात आली. अहेरी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तोडसा आणि सूरजगड प्रकल्प अशा तीन ठिकाणच्या रुग्णवाहिकांनी सेवा दिली.
चालकाने काढला पळ....

अपघातग्रस्त वाहन जीवनगट्टा येथील आहे. अपघात होताच गाडीचा चालक पळून गेला. बारसेवाडा येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. वाहनाच्या खाली अनेकजण दबले होते. गावातील काही युवकांनी वाहनाची ट्राॅली सरळ करून त्याखाली दबलेल्या जखमींना काढले. जखमींपैकी एकाला दुचाकीवर बसवून, तर इतरांना दोन रुग्णवाहिका व एका खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.h

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने