कवठाळा येथे ५९ रक्तदात्यांचे रक्तदान
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी कवठाळा येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील ५९ युवकांनी रक्तदान करून समाजसेवक डॉ.काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. यावेळी नुकतीच नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या कोरपना येथील गिरीश उर्फ प्रतिक बोरडे यांचा सत्कार करण्यात आला. तालुका आरोग्य विभाग व डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड.वामनराव चटप होते. उद्घाटक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, सत्कारमूर्ती डॉ.गिरिधर काळे व सविता काळे यांची विशेष उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती मदन सातपुते, वैद्यकीय अधिकारी डॉ.बावणे, कवठाळाचे सरपंच नरेश सातपुते, डॉ.रवींद्र हेपट, डॉ.अरविंद ठाकरे, सतीश बिडकर, पुरुषोत्तम निब्रड, मनोज भोजेकर, दीपक खेकारे, अविनाश पोईनकर, शैलेश विरुटकर आदी उपस्थित होते.
गिरीधर काळेंची निस्वार्थ लोकसेवा समाजाचं भुषण असल्याचे मत माजी आमदार चटप यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.स्वप्नील टेंभे, संचालन ॲड.दीपक चटप तर आभार हबीब शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निशिकांत डोहे, देवेंद्र हेपट, लक्ष्मण कुळमेथे, द्वारकेश ठाकरे, आशा वर्कर व कवठाळा परिसरातील युवकांनी सहकार्य केले.
समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मागील ३७ वर्षापासून बिबी येथे मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्णांची निःशुल्क सेवा करत आहे. पाच लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार करून बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना 'डाॅक्टर' ही ऐतिहासिक उपाधी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील ५९ युवकांनी रक्तदान करुन त्यांच्या लोकसेवेला सलाम केला.