वसतीगृहात राहणारी मुलगी बेपत्ता # Waroraवरोरा:- आनंदवन परिसरातील असलेल्या आनंद मूकबधिर विद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत असलेली एक मुलगी गुरुवारला पहाटे अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आनंदवन येथे मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता आनंद मूकबधिर वसतिगृहात विद्यालय चालविले जाते. यामध्ये विद्यार्थी निवासी राहतात. गुरुवारी दहाव्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थिनी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपले समान घेऊन अचानक निघून गेली.
विशेष म्हणजे, ती मुख्य प्रवेशद्वारामधून गेली आणि त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. याबाबतची माहिती शाळा प्रशासनाला मिळताच त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. ही मुलगी पुसद येथील रहिवासी असून, मागील दोन वर्षांपासून ती या शाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुलगी गायब झाल्याची माहिती कळताच शाळा प्रशासनाने व्हिडिओ फुटेज तपासले असता दोन बॅग हातात घेऊन ही मुलगी मुख्य प्रवेशद्वारा जवळील भिंत ओलांडून जात असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, मुलगी वर्दळीच्या ठिकाणाहून जात असतानाही कुणीही तिला हटकले नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात शाळा प्रशासनाला विचारले असता मुलीचा शोध घेतला जात असून, तिच्या पालकांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दिवसभर शोध घेऊनही मुलीचा पत्ता न लागल्यामुळे शाळा प्रशासनाने पोलिसात धाव घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत