'त्या' चौघींवर एकाच चितेवर मुखाग्नी, गावकरी झाले भावूक #warora #chandrapur

Bhairav Diwase


वरोरा:- वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या चार महिलांवर रविवारी एकाच चितेवर मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात शेतातून घरी परत येताना झाडाच्या आश्रयास या चौघी थांबल्या होत्या. यावेळी अंत्यसंस्काराला हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी एकाच चितेवर चौघींना पाहून नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. खासदार बाळू धानोरकर यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण वायगाव भोयर गावावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे मृतात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. हिरावती झाडे या महिला माजी पंचायत समिती सदस्य होत्या. वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) शेतशिवारात शनिवारी सकाळी शेतशिवारात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान विजांच्या कडकडाटात त्या घरी परत यायला निघाल्या होत्या. जोरदार विजांचा कडकडाट होऊ लागल्याने वाटेतील एका पळसाच्या झाडाच्या आश्रयास चौघीही महिला थांबल्या होत्या.
जोरदार वीज कडाडून त्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने चौघीही महिला जागीच ठार झाल्या. या दुर्देवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश होता. त्यापैकी हिरावती झाडे ही माजी पंचायत समिती सदस्या राहिल्याने त्यांचा या परिसरात चांगलाच जनसंपर्क होता. त्यांच्या सामाजिक कार्याशी सर्वपरिचित होते.
मृतांमध्ये पार्वता रमेश झाडे (वय ६०), मधुमती सुरेश झाडे (वय २०), रीना नामदेव गजभे (वय २०) आदींचा समावेश होता. वीज पडून चार महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती गाव परिसरात होताच सर्वत्र शोककळा पसरली. महसूल आणि पोलिस प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चारही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.
दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आले. या दुर्देवी घटनेबद्दल नागरिक भावूक झाले. एकच हंबरडा फुटला व नागरिकांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयार करण्यात आली. चौघीही महिलांचे मृतदेह एकाच चितेवर रचून मुखाग्नी देण्यात आली.
शनिवारपासून वायगाव भोयर व परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या दुर्देवी घटनेने झाडे आणि गजभे कुटुंबीयांवर दुःखांचे डोंगर कोसळल्याने या कुटुंबीयांना आधार देण्याकरीता, त्यांच्या दु:खात सहभागी होण्याकरीता आमदार प्रतिभा धानोरकर आणि खासदर बाळू धानोरकर हे दाम्पत्य अंत्ययात्रेत सहभागी झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांचा आधार दिला. दोन्ही कुटुंबीयांना आवश्क ती आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. हिरावती झाडे यांचे सामाजिक कार्य जनमानसात रूजले असल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त करून अंत्यसंस्काराला उपस्थित झालेल्या हजारों नागरिकांना आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही.