Top News

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून लाच घेताना 'झेडपी'च्या लिपिकास अटक

चंद्रपूर:- निवृत्ती पेन्शनचे कागदपत्रे महालेखापाल नागपूर यांच्याकडे पाठविण्याकरिता एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाला 4 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गोपाळ उमाजी पेंटेवार असे वरीष्ठ लिपिकाचे नाव आहे. ही घटना आज (13 सप्टेंबर)ला जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घडली.
पोलिस सुत्रानुसार, तक्रारदार सेवानिवृत कर्मचारी हे तळोधी (ता. चिमूर) येथील रहिवासी आहेत. ते कनिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे निवृत्ती पेन्शनचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे होते. मात्र वरिष्ठ लिपिक गोपाळ पेंटेवार यांनी सेवानिवृत्त प्रकरणाचे कागदपत्रे महालेखापाल नागपूर यांच्याकडे पाठविण्यासाठी फिर्यादीला 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना, या प्रकरणात स्वतःच्या कामाकरिता लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संशयीत आरोपीला पकडण्याकरीता सापळा रचला होता.
लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी, सापळा रचून लाचेची तडजोडीअंती 4 हजार रुपये रक्कम स्वीकारताना पेंटेवार यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या गेट समोर आज रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत चंद्रपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कार्यालयीन कर्मचारी रमेश दुपारे, नरेश ननावरे, पुष्पा कोचाळे, वैभव गाडगे, मेघा मोहूर्ले, अमोल सिडाम, रवी ढेंगळे यांनी संयुक्तीपणे पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने