एटापल्ली:- दुचाकीने जात असताना त्याचा अपघात झाला. त्यानंतर दवाखान्यात उपचारही घेतला. तेथून सुटी होऊन घरीसुद्धा परतला. पण रात्री झोपेतच त्याला मृत्यूने कवटाळले. अपघातात मृत्यूला हुलकावणी देऊनही शेवटी मृत्यूने त्याला झोपेत गाठल्यामुळे हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे.
परसलगोंदी येथील सुरेश मंगरु गोटा (३५ वर्ष) हे सोमवारी दुपारी परसलगोंदीवरून हेडरीकडे मोटारसायकलने जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटारसायकला अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. त्यामुळे गोटा यांना हेडरी येथील त्रिवेणी कंपनीच्या दवाखान्यात उपचाराकरीता नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. रात्री ते झोपी गेले, पण सकाळी उठलेच नाही. सकाळी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्युचे कारण कळणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.