Top News

पोंभूर्णा नगरपंचायतने केली अग्निशमनच्या शेडसाठी अवैध वृक्षतोड #chandrapur #pombhurna


वृक्ष प्राधिकरण समितीच वांद्यात

सदस्यांनी नकार दिलेल्या झाडांचीच झाली कत्तल
पोंभूर्णा :- वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी शासनाने अनेक रूपये खर्चून जनजागृती व वृक्ष लागवडीचे व्यापक कार्यक्रम करण्यात आले. वृक्ष जगला तर निसर्गाचे संतुलन टिकून राहिल. मात्र अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरू असल्याने शासन स्तरावरून अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र)झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ च्या कलम ८ अन्वये नागरी क्षेत्रावरील(खासगी, शासकीय) वृक्षतोडीला प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली करत अनेकांनी वृक्षतोडीचा सपाटा लावला.खुद्द नगरपंचायतने वृक्ष प्राधिकरणाच्या नावाखाली नगरपंचायतच्या आवारात असलेल्या ५० वर्षांपूर्वीच्या ६ झाडांची कत्तल करून शासनाच्या वृक्ष लागवडीचा फज्जा उडवला आहे.

पोंभूर्णा नगरपंचायतने अग्निशामक दलाची गाडी उभी करण्याकरिता शेडचे बांधकाम करण्यासाठी नगरपंचायत आवारातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या ५० वर्षांपूर्वीचे मोठ्या बुडाचे ६ झाडांची कत्तल केली आहे. नगरपंचायतकडे इतरेतर स्वत:चे भुखंड असतांना नेमके त्याच जागेवर शेड बांधकाम करण्याचा घाट कशासाठी याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. केवळ शेडबांधकाम करण्यासाठी नगरपंचायतने वृक्ष प्राधिकरण समिती गठीत केली असली तरी त्याबद्दल नगरपंचायतचे विरोधी नगरसेवकांना सुद्धा याची माहिती नाही. याच समितीच्या सदस्याने जे पर्याय सुचविले याकडेही वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी दुर्लक्ष करून मोठ्या बुडाचे व पन्नासवर्षापुर्वीचे झाडं तोडले आहे.

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवड करुन महाराष्ट्र नव्हे तर देशात या वृक्षलागवडीची प्रशंसा करवुन घेतली पण भाजपाची सत्ता असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत ने मात्र वृक्षतोड करून सुधिर मुनगंटीवार यांच्या महत्वकांक्षी प्रोजेक्टला हरताळ फासली आहे.

ही वृक्षतोड कशासाठी व कोणाच्या आदेशाने करण्यात आली याची चौकशी होणे क्रमप्राप्त ठरते.यामुळे या वृक्षतोड प्रकरणाची सविस्तर व उच्चस्तरीय चौकशी करून वृक्षतोड करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोंभुर्णा शहरवासियांनी केली आहे.
मुळातून वृक्ष प्राधिकरण समितीच वादाच्या भोवऱ्यात आहे. वृक्ष तोडून पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदार व संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी.
अविनाश वाळके,
पर्यावरण प्रेमी, पोंभूर्णा

अग्निशामक गाडीच्या शेड बांधकामासाठी जी वृक्ष तोड करण्यात आली ती नियमबाह्य आहे.संबंधित प्रकरणाची चौकशी करून बेकायदेशीर वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
सौ. रामेश्वरी वासलवार,
नगरसेविका, नगरपंचायत पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने