पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास वीज पुरवठा होणार #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने दि.३० नोव्हेम्बर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.

विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका असल्याने तसेच कृषीपम्पासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धते मुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नसल्याने कृषीपम्पासाठी रोज ८ तासांच्या वीज उपलब्धते ऐवजी या जिल्ह्यातील कृषीपम्पाना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
उपमुख्यमंत्र्यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषीपम्पाना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३० नोव्हेंर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.