व्यवस्थापक, प्रशिक्षकांवर कारवाईची शिफारस #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversity


बॉल बॅडमिंटन संघाच्या मुलींचे तक्रार प्रकरण

चौकशी समितीचा अहवाल सादर


चंद्रपूर:- चेन्नई येथे गेलेल्या मुलींच्या बॉल बॅडमिंटन संघाच्या तक्रारीवरून संघाचे व्यवस्थापक विजय सोमकुंवर व प्रशिक्षक राजेश हजारे यांच्याविरुद्ध गोंडवाना विद्यापीठाने सिनेट सदस्यांची चौकशी समिती गठित केली होती. समितीने केलेल्या चौकशीत दोन्ही पदाधिकारी दोषी आढळले. त्यांना पाच वर्षांसाठी विद्यापीठाच्या सर्व कामकाजातून निलंबित करावे व बढती रोखण्याबाबत कुलगुरूंनी शिफारस करावी, असा अहवाल समितीने सादर केला आहे. मात्र, दोघांनी मुलींशी छेडखानी किंवा गैरव्यवहार न केल्याचा सुतोवाच समितीने अहवालात केला आहे, हे विशेष....

बॉल बॅडमिंटन संघातील दहा मुलींनी सोमकुंवर व हजारे यांच्याविरुद्ध विद्यापीठाकडे तक्रार दिली होती. हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये चांगलेच गाजले. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले. दोन बैठकांमध्येच समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. १० पैकी ८ मुली समितीसमोर हजर झाल्याने लेखी बयान नोंदवले. तसेच सोमकुंवर आणि हजारे यांच्याही लेखी बयानांची नोंद केली. बयाणांच्या विश्लेषणातून व पूर्व इतिहास बघून समितीने अहवाल सादर केला.

अहवालात नमूद आहे की, प्रशिक्षक हजारे यांनी दौऱ्यात मद्यप्राशन केल्याचे मान्य केले आहे. चमूला स्पर्धेसाठी नेण्याची जबाबदारी व्यवस्थापकाची असताना सोमकुंवर यांनी चमूला हजारे यांच्या भरवश्यावर पाठवले आणि स्वतः दुसऱ्या दिवशी म्हणजे, २६ जानेवारीला चेन्नईला रवाना झाले. विद्यार्थिनींची प्रकृती बरी नसतानाही व्यवस्थापकांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. परतीच्या प्रवासातही त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतः आरक्षित बाकावर झोपून राहिले. यापूर्वीही धर्मशाळा येथे झालेल्या स्पर्धेत विद्यार्थिनीची प्रकृती बरी नसताना सोमकुंवर असल्याच्या तक्रारीवरून त्यांना १७ जानेवारीला झालेल्या विधिसभेतच काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला होता. तरीही क्रीडा संचालकांनी त्यांना २५ जानेवारीच्या स्पर्धेच्या दौऱ्यावर तेही मुलींसोबत जाण्याचे पत्र काढले. आरोपांची सिद्धता चौकशीत होत असल्याने समितीने त्यांच्यावर कारवाईसाठी काही शिफारशी केल्या आहेत.

या समितीत अधिसभा सदस्य तथा समिती संयोजक गुरुदास कामडी, चौकशी समिती सदस्य प्रशांत दोंतुलवार, संजय रामगिरीवार, डॉ. चंद्रशेखर कुंभारे, निलेश बेलखेडे, डॉ. मिलींद भगत हे होते.


मुलींच्या संघासोबत महिला व्यवस्थापकच पाठवा

मुलींच्या संघासोबत महिला व्यवस्थापक किंवा महिला प्रशिक्षकच पाठवावे, अशी प्रथा असताना गोंडवाना विद्यापीठ मुलींच्या संघासोबत पुरुष व्यवस्थापक व प्रशिक्षक पाठवते. हे योग्य नाही. यापुढे तरी मुलींच्या संघासोबत महिला पाठवा, अशी पुरक शिफारस चौकशी समितीने कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत