Top News

26 मार्च रोजी 127 आदिवासी तरुण-तरुणींचा विवाह सोहळा #chandrapur


गडचिरोली:- गडचिरोली पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने येत्या 26 मार्च रोजी आत्मसमर्पण केलेल्या 8 नक्षल्यांसह दुर्गम भागातील 127 आदिवासी तरूण-तरुणींचा विवाह सोहळ्याचे येथील अभिनव लॉनच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल व मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंड यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

पोलिस दादालोरा खिडी मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. आदिवासी बांधवांची भयग्रस्त वातावरणातून मुक्तता करणे तसेच त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. सामुहिक विवाह सोहळा देखील त्याच शृंखलेतील एक उपक्रम आहे. मैत्री परिवारातर्फे 2015 ला नागपूर येथील सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, आत्मसमर्पित व आदिवासी बांधवांना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 2018 पासून गडचिरोली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मैत्री परिवार संस्था दीड दशकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. मैत्री परिवराने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून पोलिस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दिपावली सण साजरा करण्यासोबतच, कपडे वाटप, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे राबविले जात आहेत. 2018 साली पहिल्यांदा सामुहिक विवाह सोहळा घेण्यात आला. याआदी नागपूर व अहेरी येथे प्रत्येकी एक गडचिरोली येथे दोन सामुहिक विवाह सोहळे घेण्यात आले. आतापर्यंत 15 आत्मसर्पित नक्षल जोडप्यांसह एकूण 433 आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले आहे. 26 मार्च रोजी आयोजित विवाह सोहळ्याला गडचिरोली व नागपूर येथील अनेक मान्यवर, गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी आणि मैत्री परिवाराचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

यामध्ये सहभागी 8 नक्षल्यांची नावे सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून उघड करण्यात आले नसून सर्व जोडप्यांना सोन्याचे एक डोरले व संसारोपयोगी साहित्य देण्यात आहे. दानशुर व्यक्तींनी प्रत्येकी एका जोडप्याचे पालकत्व स्वीकारून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करू शकणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. पत्रपरिषदेला पोलिस अधीक्षक निलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भंडे, सचिव प्रमोद पेंडके यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने