बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- अल्पावधीत राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे खासदार बाळू धानोरकर या लाडक्या लोकनेत्याचे पार्थिव मंगळवारी दुपारी वरोरा येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली. चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिक अत्यंत खिन्न मनाने भाऊंच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत वरोऱ्यात दाखल होत असल्याचे दिसून आले.

लोकसेवेचे राजकारण करत असताना त्यांनी तरुणाईला आपलेसे केल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. बुधवारी शासकीय इतमामात भाऊंना अखेरचा निराेप देण्यात येणार असून, वरोरा बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी बाळूभाऊंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा शोक अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती. बुधवारी ३१ मे रोजी वणी-वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांनी दिली.