Top News

रमेश राजूरकर करणार २५ जून ला भाजपमध्ये अधिकृत प्रवेश #chandrapur #bhadrawati #warora


चंद्रपूर:- वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील विधानसभेचे उमेदवार रमेश राजूरकर हे रविवार, २५ जून रोजी भद्रावती येथील जैन मंदिराच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, पूर्व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये नवीन चेहरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रमेश राजूरकर यांनी भाजपमध्ये जाण्यामागील बाजू स्पष्ट केली. (Ramesh Rajurkar will officially join BJP on 25th)

पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, किशोर गोवार दिपे, प्रशांत डाखरे, प्रा. प्रणिता शेंडे, तुळशीराम श्रीरामे, बांगडे प्रवीण सातपुते, पंढरीनाथ पिंपळकर आदींची उपस्थिती होती.

सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविताना अनेक अडचणी येतात. समाजकार्य करताना या अडचणी सोडविण्यासाठी राजकारणाची जोड असणे आवश्यक असल्याचा आपल्याला अनुभव आला आहे. सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर आपला भर आहे. विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याने आपण पक्ष प्रवेश करणार असल्याचे राजूरकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशाला ज्या पद्धतीने प्रगतिपथावर आणले, त्यांच्या या कार्याने आपण प्रभावित झालो असून, राज्य तसेच जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्यासोबत अनेक सरपंच, विविध सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने