लग्नास नकार देत प्रेयसी पोलिस ठाण्यात, प्रियकराने संपविले जीवन #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- जिच्यावर जीव ओवाळून टाकला, गुलाबी स्वप्न पाहिले तिने ऐनवेळी लग्नास नकार देत पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ जून रोजी रात्री दहा वाजता घोट (ता. चामोर्शी) येथे घडली. गणेश अशोक कागदेलवार (वय २२, रा. घोट) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

त्याने बीए पदवी मिळवली होती. मिळेल ते काम करून तो घरी हातभार लावत असे. त्याचे गावातीलच एक युवतीशी सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते, त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्याने तिच्यासोबत संसार थाटण्याचे ठरवले. मात्र, प्रेयसीने लग्नास नकार दिला. एवढ्यावरच ती थांबली नाही तर लग्नासाठी तगादा लावल्याने गणेश कागदेलवारविरोधात तिने घोट पोलिस मदत केंद्रातही धाव घेतली. १८ जून रोजी पोलिसांनी दोघांनाही समोरासमोर बोलावल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. दरम्यान, प्रेयसीने लग्नास नकार देत पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा वार गणेश कागदेलवार याच्या जिव्हारी लागला. त्याने रागाच्या भरात घरी लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घोट मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप रोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुरारी गेडाम तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या