सिंदेवाही:- तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वासेरा अंतर्गत मागील चार महिन्यांपूर्वी थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी "वॉटर एटीएम" सुरू कण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री भुरट्या चोरांनी त्या एटीएममधील पाच रुपयांचे नाणे चोरून नेण्यासाठी चक्क वॉटर एटीएम फोडल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार झालेला होता. (Water ATMs were broken for only five rupees in Chandrapur district!)
गाव तेथे वॉटर एटीएम या शासनाच्या अभियानात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मागील एक वर्षापासून वॉटर एटीएमचे काम सुरू होते. मागील चार महिन्यांपूर्वी वासेरा येथील वॉटर एटीएम मशीन सुरू करण्यात आली. तेव्हापासून नागरिकांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मशीनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून नागरिकांना १५ लीटर पाणी विकत घेता येत होते. अशातच शनिवारी रात्री भुरट्या चोरांनी वॉटर एटीएम मशीन फोडले. त्यामुळे वॉटर एटीएम मशीन बंद पडलेली आहे. सरपंच महेश बोरकर, पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.