Top News

राग क्षणाचा... घात 'जिंदगीचा'! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा #chandrapur #wardha

वर्धा:- तू माझ्याकडे का बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस... आमच्या अंगणात तुझी गाडी का लावली...खर्रा का दिला नाही... दारू पिण्यास पैसे का दिले नाही... प्रेमप्रकरणातून आदी किरकोळ कारणांतून हाणामारी, चाकू हल्ले होत आहेत. अगदी प्राणघातक हल्ल्यांपर्यंत तरुणाईंची मजल गेली आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत तब्बल १० खुनांनी जिल्हा रक्ताळला आहे. त्यामुळे 'राग क्षणाचा...घात जिंदगीचा' असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञ मंडळीकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (The anger of the moment... the threat of 'life'! District bloodied by 10 murders)

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेर या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० खुनाच्या घटना घडल्या. तर १२ जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे दुखापती केल्याप्रकरणी ३५८ गुन्हे दाखल करण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दररोज हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यातील अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत जातही नाहीत तर काही प्रकरणात गुन्हे दाखल होतात. एकंदरित हे सर्व पाहता हिंसक वृत्तीच्या कारवाया जिल्ह्यात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

हल्ल्याच्या केंद्रस्थानी 'व्यसनाधिनता'

बहुतांश वेळा हल्ल्यामध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गांजा अगदी सहज उपलब्ध होत आहे. किरकोळ कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक घटनांमध्ये आरोपी व्यसनाधीन राहत असल्याचे अनेक घटनांत पुढे आले आहे.

जिल्ह्यात २४ जणी ठरल्या वासनेच्या शिकार

महिलांवरील होणारे अत्याचार चिंताजनक बाब बनली आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल २४ जणी वासनेच्या शिकार ठरल्यात. पोलिसांनी सर्व नराधमांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. मात्र, याला विकृत मानसिकता कारणीभूत आहे, हेही तितकेच खरे.

चार ठिकाणी दरोडा ५८ ठिकाणी घरफोडी

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेरपर्यंत चार ठिकाणी दरोडा पडला, तर ८ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले. इतकेच नव्हे, तर ५८ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून २१६ चोरीच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात चोरी अन् घरफोडीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.

दाखल गुन्ह्यांची आकडेवारी....

हत्या- १०
जीवघेणा हल्ला - १२
दुखापत - ३५८
बलात्कार - २४
दरोडा - ०४
जबरी चोरी - ०८
घरफोडी - ५८
चोरी - २१६

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने