चंद्रपूर:- ओबीसींच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. ओबीसी मंत्रालय स्थापन झाल्यापासून आजवर कधी नव्हे ते ३२ जीआर ओबीसींच्या हिताचे पारित करण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्याने या पक्षात प्रवेश ओबीसी नेते प्राचार्य अशोक जीवतोडे यांनी घेतला. असंख्य ओबीसी समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.
रविवारी (ता. २५ जून) जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.
कोण आहेत प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे?
डॉ. जिवतोडे ३५ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जिवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जिवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०१८ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात डॉ. जिवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले होते.
पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थिती
पक्ष प्रवेश सोहळ्याला देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणविस, आमदार बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री परिणय फुके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे, आशीष देशमुख आदी उपस्थिती होती.
काय म्हणाले प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे?
आमची आजवरची लढाई ही ओबीसींच्या हितासाठी राहिलेली आहे. यापुढेही ओबीसींच्या हितासाठी झटणार आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. येथे राहून हा लढा अधिक परिणामकारक रीतीने पुढे नेता येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला .असे डॉ. जिवतोडे बोलताना सांगितले.